Press "Enter" to skip to content

उपक्रम

व्यावसायिक प्रशिक्षण

प्रकाशन व्यवसायाचे पद्धतशीर शिक्षण देणारे अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठांत नाहीत. नॅशनल बुक ट्रस्ट व इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिशिंग, नवी दिल्ली यांच्या मार्फत काही अभ्यासक्रम योजले जातात; परंतु हे अभ्यासक्रम बहुदा इंग्लिश माध्यमातील असतात व तेही बहुश: दिल्लीत होतात. सर्व सामान्य मराठी व्यावसायिकाला, व्यवसाय सोडून काही आठवडे / महिने दिल्लीला स्वत: जाणे अगर एखाद्या माणसाला पाठविणे सोयीचे नसते. शिवाय पुष्कळदा या अभ्यासक्रमातून प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांच्या गरजांचा पुरेसा विचार केलेला असतोच असे नाही. या सर्व दृष्टीने संघामार्फत प्रकाशन व्यवसायाच्या सर्व अंगांची माहिती करून देणारे अभ्यासक्रम आयोजित केले आहेत. शिवाय “प्रकाशन व्यवसाय परिचय”(लेखक – शरद गोगटे) हे पुस्तकही अ.भा.म.प्रकाशक संघाने प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशनाचा हा प्रकल्प व्यावसायिक प्रशिक्षणाला पूरक आहे.

हस्तलिखिताचं पुस्तक होण्याची प्रक्रिया सुरवंटाचं फुलपाखरू होण्याइतकीच रोमांचक आहे. हा संपूर्ण स्वरूपात्मक बदल प्रकाशक घडवत असतो. या बदलाच्या हस्तलिखित वाचन व स्वीकार, संपादन, रूपांकन, मुद्रण, बांधणी या प्रत्येक टप्प्यावर प्रकाशक काय करतो, किंवा त्यानं काय करावं याची क्रमवार माहिती देणारं मराठीतील पाहिलंच पुस्तक.

पुस्तक तयार झाल्यावरही प्रकाशकाची कामं संपत नाहीत. पुस्तकाचा प्रसार व विक्री ही त्याचीच जबाबदारी. याचाही विचार पुस्तकात केला आहे. प्रकाशनाचे अर्थकारण, व्यवस्थापन व सर्व संबंधित कायदे यांचाही आवश्यक तपशील दिला आहे. या शिवाय परिशिष्टांतून युनेस्कोची ग्रंथसनद व इतर उपयुक्त माहिती दिली आहे.

‘युनेस्को’ नी केलेली पुस्तकाची व्याख्या – ‘पुस्तक म्हणजे मलपृष्ठाव्यतिरिक्त किमान ४९ पृष्ठे असलेले व नियतकालिक नसलेले मुद्रित प्रकाशन’. (A book is a non-periodical printed publication of not less than 49 pages exclusive of covers.)

या पुस्तकाचे लेखक शरद गोगटे हे एम.ए., एल.एल.बी. असून १९६३ पासून ग्रंथ व्यवसायात. १९६८ साली ग्रंथविक्रीच्या स्वतंत्र व्यवसायाला प्रारंभ. १९७५ साली ‘शुभदा-सारस्वत’ या नावाने स्वतंत्र प्रकाशनसंस्थेची स्थापना. पुणे विद्यापीठाच्या संपादन व वृत्तविद्या विभागाच्या पदवी व पदव्युत्तर विध्यार्थांना ग्रंथ प्रकाशन हा विषय शिकवत. प्रकाशनविषयक अभासक्रमांसाठी अतिथी प्राध्यापक. २००१ पासून व्यवसायातून निवृत्त. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून २००५ पर्यंत संघाचे अध्यक्ष.

प्रकाशन व्यवसाय परिचय – शरद गोगटे

(‘प्रकाशन व्यवसाय परिचय’ लेखक – शरद गोगटे हे पुस्तक अ.भा.म.प्रकाशक संघाच्या कार्यालयात विक्रीस उपलब्ध आहे.)

पुणे कार्यशाळा

अ.भा.म.प्रकाशक संघाच्या स्थापनेनंतर प्रकाशन व्यवसायात काम करणाऱ्या व नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने अशा दोन दिवसीय कार्यशाळा पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागात घेण्यात आल्या. या कार्यशाळेत शरद गोगटे, अविनाश पंडित, विश्वास दास्ताने, सुनील अंबिके, शशिकला उपाध्ये, राजीव बर्वे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थितांपैकी अनेकांनी प्रकाशन व्यवसाय सुरु केला व ते आजही या क्षेत्रात काम करत आहेत.

नागपूर कार्यशाळा २००४

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे नागपूर शहरात २००४ साली दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रकाशक, विक्रेते व प्रकाशन व्यवसायात नव्याने येण्यास इच्छुक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत अ.भा.म.प्रकाशक संघाच्या प्रतिनिधींनी पुढील विषयांवर मार्गदर्शन केले. प्रकाशन व्यवसायात येताना व संहिता संपादन – शशिकला उपाध्ये, संदर्भ ग्रंथांचे संपादन – शरद गोगटे, डी.टी.पी. – निनाद पांडे, प्रुफ रीडिंग – अविनाश पंडित, कागदाची निवड व प्रिंटिंग – विज्ञानेश्र्वर बनहट्टी, निर्मिती खर्च, पुस्तकाची किंमत व नफा – मकरंद कुलकर्णी, पुस्तकाची जाहिरात व मार्केटिंग – विनोद लोकरे.

अशा प्रकारची कार्यशाळा २००५ मध्ये नाशिकमध्येही आयोजित करण्यात आली.

इंदूर कार्यशाळा २२ व २३ नोव्हेंबर २०१५

मुक्त संवाद, मध्यप्रदेश मराठी अकादमी भोपाळ, लिवा (लिहा-वाचा) क्लब इंदूर आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदूर येथे २२ आणि २३ नोव्हेंबर २०१५ या दोन दिवसांमध्ये लेखक-प्रकाशक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इंदूर येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेकरता अ.भा.म.प्रकाशक संघाचे प्रतिनिधीत्व राजीव बर्वे, शरद गोगटे, अविनाश पंडित, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, सुकुमार बेरी आणि पराग लोणकर यांनी केले. यजमान संस्थेच्या अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पाच सत्रांत संघाच्या प्रतिनिधींची व्याख्याने झाली. तसेच कार्यशाळेत ३० सहभागी प्रतिनिधी होते ज्यांतील प्रामुख्याने इंदूर शहरातील होते. भोपाळचे काही प्रतिनिधी सहभागी होते. या कार्यशाळेत या प्रतिनिधीच्या सहभाग प्रवेशासाठी आकार नव्हता. संघातर्फे सहभागी प्रतिनिधींना लेखन साहित्य, ‘प्रकाशन व्यवसाय परिचय’ हे संघातर्फे प्रकाशित करण्यात आलेले शरद गोगटे सरांचे पुस्तक आणि एडिटमित्र या संस्थेतर्फे प्रकशित संपादन या विषयाला वाहिलेला शब्दस्पर्श (२०१४चा दिवाळी अंक) यांचा समावेश असलेला संच देण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरता यजमान संस्थेचे विश्वनाथ शिरढोणकर, अश्विन खरे, अरविंद जेवणेकर यांनी मोठे परिश्रम केले व त्यांचे अ.भा.म.प्रकाशक संघाला मोलाचे सहकार्य लाभले.

व्याख्याने, चर्चा व मुलाखतींचे आयोजन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा कडून वेळोवेळी, निर्मिती स्वामित्व हक्क(copy right), ग्रंथ वितरण, आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथ क्रमांक(ISBN), पायरसी या व प्रकाशन व्यावसायिकांना उपयोगाच्या अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चा व मुलाखती यांचे संघामार्फत आयोजन केले जाते. तसेच प्रकाशकांच्या अडचणी व समस्यांवर चर्चा सत्राचे आयोजन अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत केले जाते.

नवीन पुस्तकांची प्रदर्शने

पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या बाहेर पाठ्येतर पुस्तकांची नियमित विक्री करणारे ग्रंथ विक्रेते पुरेसे नसल्यामुळे नवीन ग्रंथ रसिकांना बघायला मिळत नाहीत. त्यांच्यासाठी फक्त नवीन पुस्तकांची प्रदर्शने पुणे-मुंबईच्या बाहेर करण्याचे प्रयोग अ.भा.म.प्रकाशक संघाने केले आहेत. या प्रदर्शनांची जबाबदारी सुकुमार बेरी यांनी यशस्वीपणे सांभाळी.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ विक्री

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, अ.भा.म.प्रकाशक संघाकडून स्टॅाल्स घेऊन, विविध प्रकारच्या मराठी पुस्तकांची विक्री करण्यात आली, तसेच अ.भा.म.प्रकाशक संघाच्या इतर उपक्रम व कामाची माहिती ही देण्यात आली. हा प्रयोग पुणे, नाशिक व अहमदनगर या ठिकाणी करण्यात आला. या उपक्रमाची जबाबदारी शशिकला उपाध्ये यांनी यशस्वीपणे सांभाळी.

वर्ल्ड बुक फेअर, दिल्ली

अ.भा.म.प्रकाशक संघाची स्थापना झाल्या पासून राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार या संस्थे मार्फत दर दोन वर्षांनी दिल्ली येथे भरणाऱ्या वर्ल्ड बुक फेअर मध्ये अ.भा.म.प्रकाशक संघाने मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व केले आहे.

०९ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीत प्रगती मैदान, दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या वर्ल्ड बुक फेअर मध्ये अ.भा.म.प्रकाशक संघाने स्टॅाल घेऊन ३५ मराठी प्रकाशकांची सर्व प्रकारची पुस्तके मांडण्यात आली होती. अ.भा.म.प्रकाशक संघाचे प्रतिनिधींत्व सुकुमार बेरी व पराग लोणकर यांनी केले.

ग्रंथ प्रदर्शन ०६ ते १२ जानेवारी २०१६

पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या सहकार्याने, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर परिसरात दि. ०६ ते १२ जानेवारी २०१६ या काळात होते. प्रदर्शनात चाळीस स्टॅाल्स होते व सर्व प्रकारची पुस्तके होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापले व महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत झाले.

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शन

पिंपरी – चिंचवड येथे दि. १५ ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनात प्रकाशक, विक्रेते यांच्या वीज, पंखे, खुर्च्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षा व्यवस्था यांचे नियोजन या समस्या व अडचणी साहित्य महामंडळाला अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत पत्राव्दारे कळवण्यात आल्या. व त्याचा पाठपुरावा अ.भा.म.प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे व उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये यांच्या मार्फत करण्यात आला आणि अडचणी सोडवण्यात आल्या.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, ग्रंथखरेदी २०१५

राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानातर्फे – शासनमान्य ग्रंथालय संचालनाकडून २०१३-१४ या वर्षा मधील ग्रंथखरेदी नोव्हेंबर २०१५ या महिन्यात करण्यात आली. याकरिता संघामार्फत ऑर्डर प्राप्त ४२ प्रकाशकांची पुस्तके पाठवण्याची व्यवस्था संघामार्फत करण्यात आली. दरवर्षी संघामार्फत ही व्यवस्था करण्यात येते व पाठपुरवठा करण्यात येतो.

प्रेस अॅक्टनुसार शासकीय ग्रंथालयांना पुस्तके पाठविणे

अ.भा.म.प्रकाशक संघाकडून प्रेस अॅक्टनुसार शासकीय ग्रंथालयांना पुस्तके पाठविली जातात. ही योजना संघाच्या सर्व सभासदांसाठी सशुल्क उपलब्ध आहे.

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार

लेखकाचे लेखन पुस्तक स्वरुपात वाचकांना उपलब्ध होईपर्यंत त्या लेखनाला अनेक टप्पे पार करावे लागतात. जसे संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन, टायपोग्राफी, ले-आउट मांडणी इत्यादी. त्यानंतर विषयानुरूप पानांची सजावट, प्रत्यक्ष छपाई व बांधणी असे अनेक टप्पे पार करत त्या लिखाणाला पुस्तकाचे स्वरूप प्राप्त होते.

या ग्रंथनिर्मिती प्रक्रियेत प्रकाशकाने दाखवलेल्या कौशल्याची व कल्पकतेची योग्य दखल घेतली जावी आणि ग्रंथ निर्मिती अधिकाधिक चांगली होण्यासाठी प्रकाशकांना प्रोत्साहन मिळावे यांसाठी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने’ ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ हा उपक्रम सुरु केला आहे. ग्रंथ प्रकाशन प्रकियेत ग्रंथनिर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. महाराष्ट्रभरच्या अनेक संस्था लेखनासाठी लेखकांना पारितोषिके देत असतात; पण या संस्था किंवा राज्य सरकार पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रातील जो सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे प्रकाशक असतो; परंतु त्याचीच दखल घेतली जात नाही. प्रकाशकांसाठी कोणतेही पारितोषिक महाराष्ट्रात नव्हते. ग्रंथनिर्मितीत ग्रंथच्या विषयानुरूप वैविध्य राखण्यासाठी, त्यात आवश्यक कलात्मकता आणण्यासाठी प्रकाशक विविध पातळ्यांवर भूमिका बजावत असतो, कल्पकता दाखवत असतो. या प्रयत्नांची दखल घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने २००३ पासून उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार योजना सुरु केली. सर्व प्रकारच्या वाड्मयाच्या पुस्तकांची दखल घेतली जावी या दृष्टीने अ.भा.म.प्रकाशक संघाने पुस्तकांची वर्गवारी केली आहे. विषयांनुसार १५ विभागांमध्ये मिळून एकूण ३० पुरस्कारांची ही योजना आहे. प्रकाशकाला हा पुरस्कार मानचिन्ह व प्रशस्तिपत्र या स्वरुपात प्रदान करण्यात येतो. तसेच प्रत्येक सहभागी प्रकाशकास प्रशस्तिपत्र देण्यात येते.

या उपक्रमाची जबाबदारी प्रदीप चंपानेरकर यांनी २००३ ते २००९ या काळात यशस्वीपणे सांभाळी. या कालखंडात ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ या उपक्रमाचे एकूण पाच कार्यक्रम संपन्न झाले. प्रदीप चंपानेरकर यांनी वेळोवेळी जाणकारांची निवड सामिती स्थापन करून उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करण्यात आली. या निवड समितीत शेखर गोडबोले, सुजित पटवर्धन, अविनाश पंडित, मुकुंद टाकसाळे या सदस्यांनी काम पाहिले. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यांसाठी डॉ. अरुण टिकेकर, सुभास अवचट, शि.द. फडणीस, रामदास भटकळ, प्रतापराव पवार, दिलीप माजगावकर, ही पाहुणे मंडळी उपस्थित होती.

१ मार्च २०१३ रोजी, २०१० ते २०१२ मधील पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल प्रेसिडेंट, प्रभात रोड पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे पदाधिकारी सुधीर मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त प्रकाशकांना पुरस्कार देण्यात आले.

२०१३ व २०१४ मधील पुरस्कार वितरण सोहळा २८ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रकाशकांच्या उत्तम प्रतिसादात जेष्ठ लेखक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ विक्री या क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तम कामगिरी करण्याऱ्या बेळगाव येथील ‘नवसाहित्य बुकस्टॅाल’ या संस्थेचे जेष्ठ संस्थापक जवळकर बंधू यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

२०१५ मधील उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार वितरण सोहळा १८ सप्टेंबर २०१६ रोजी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाला. या सभारंभात बॉम्बे बुक डेपोचे माजी संचालक श्री. पांडुरंग कुमठा यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. अ.भा.म. प्रकाशक संघाचे विश्वस्त श्री.शरद गोगटे, पॅाप्युलर प्रकाशनाचे संचालक श्री.रामदास भटकळ हे उपस्थित होते. श्री. रामदास भटकळ यांनी आपल्या भाषणात श्री. पांडुरंग कुमठा यांच्या कार्याविषयी सांगितले. श्री. पांडुरंग कुमठा यांनीही आपले विचार व्यक्त केले. या सभारंभात श्री. पांडुरंग कुमठा यांच्या हस्ते प्रकाशक संघाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन गोगटे यांनी केले. या समारंभात संघाचे कार्यकारणी सदस्य व अन्य सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१६ व प्रकाशक मेळावा, केंद्रीय संदर्भ ग्रंथालय, कोलकत्ता व अ.भा.म.प्र. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट २०१७ रोजी ‘मराठा चेंबर ऑफ कॅामर्स’च्या पद्मजी सभागृहात संपन्न झाला. या सभारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ लेखक, माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचलनालयाचे संचालक श्री. किरण धांडोरे व केंद्रीय संदर्भ ग्रंथालय, कोलकत्ता येथील मराठी भाषेच्या सहसंपादक वैष्णवी कुलकर्णी या सभारंभास उपस्थित होत्या. त्यांनी संपादिक केलेल्या ‘मराठी बाल साहित्य सूची – २००१ ते २०१६’ या वेळी प्रकाशित करण्यात आली. तसेच साहित्य अकादमी मराठी भाषा विभागातील युवा पुरस्कार विजेते राहुल कोसंबी व बाल साहित्य पुरस्कार विजेते ल.म.कडू. यांचा सत्कार अ.भा.म.प्रकाशक संघा कडून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पराग लोणकर यांनी केले.